मनाला स्पर्श करणाऱ्या 05 मराठी कथा । Marathi Katha
मराठी भाषा हि अनेक कथा, कादंबऱ्या, लेख, लघुकथा यांनी वृद्धिंगत आहे. अशाच मराठी भाषेतील मनातील अनेक भावनांना खोलवर स्पर्श करणाऱ्या Marathi Katha आम्ही तुच्या पुढे सादर करीत आहोत.
Table of Contents
मुका पाऊस – Marathi katha
शैलजा खडे, कोल्हापूर
तिच्या तोंडातून गळणाऱ्या लाळंकडं नुसतंच एकटक पाहत बसलेल्या बाब्यानं मधूनच वाकून आभाळाकडं पाहिलं. नि नरड्याच्या शिरा ताणून तो किंचाळला, “आता बास कर की वाईच बरसायचा. सगळं धुन तर नेलंस निदान मुकं जनावर तरी वाचू दे.” अन् गुडघ्यात मुंडकं घालून तो रडू लागला. रडण्याच्या आवाजानं सुकत चाललेल्या हिरानं किलकिल्या डोळ्यानं बाब्याकडं पाहिलं. नाक दारून लांब उच्छ्वास तिनं सोडला. माणसालाही लाजवेल अशी अपार करुणा भरलेल्या तिच्या डोळ्यांतून टपकन अश्रू गळला.
पाणी मुरलेल्या ओल्या जमिनीवर सर्वांगावर सुया टोचाव्यात अशा गारठ्यात हिरा निपचित पडली होती. गेले पाच-सहा दिवस चाऱ्याविना तिचं शरीर सुकत चाललं होतं. पोटाच्या बाजूला असणारी कातडी सुकून आतल्या हाडांचा सापळा पार खपाटाला गेला होता. बाहेरचा पाऊस नि बाब्याच्या डोळ्यांतल्या अश्रूंचा पाऊस याला काही अंतच न्हवता. हिरा अधूनमधून डोळं उघडायची. बाब्याकडं पाहत सुस्कारे टाकायची. बाब्याला त्याच्या लाडक्या गाभ असलेल्या हिराची काळजी गाव सोडवू देत न्हवती. तिच्या गाभाचे शेवटाले दिवस भरीत आलं होतं. जाणार तरी कुठं व कसं ? सगळं गावच ठप्प झालं होतं. पुराचं पाणी हां हां म्हणता बाब्याच्या घराच्या उंबऱ्यापर्यंत येऊन पोचलं.
यंदाचा पाऊस उरात धडकी भरवणारा, डोळ्यांतले अश्रूही आटवणारा वाटला. माणूस सोडाच चिटपाखरूही फडफडू नये असा बेफाम पाऊस कोसळत होता. तर सप्ताह सरला तरी उन्हाची कोवळी तिरीपही पडली न्हवती. बाब्या घोटभर पाण्यावर आणि घरातल्या शिल्लक असल्या-नसलेल्या धान्यावर कसातरी जीव राखीत आला होता. मूठभर तांदूळ तो कोरडेच खायचा. चुलीतली राखही पावसाच्या पाण्यानं
शिल्लक ठेवली न्हवती. तिथं खायचं शिजवायला काडी कुठली पेटवणार ? घरातला असा एकही कोपरा शिल्लक राहिला नाही जिथं ओल न्हवती. बाब्यानं घरच्या माळ्यावर आसरा घेतला. घर ते कसलं? बायको-मुलांच्या हसण्या खिदळण्याला तसं पोरकंच होतं ते. चार आडोसे असलेली पत्रा मारलेली माती-दगडाची खोलीच ती. पुराच्या पाण्यानं बाब्याच्या घरचा उंबरठाही पार केला. तसं बाब्याचं आवसान पार गळलं. माळ्याच्या खालच्या अंगाला हिरा निपचित पडलेली… बाब्या माळ्यावरून खाली उतरला अन् हिराच्या गळ्यात गळा टाकून हमसून रडू लागला.
पुराच्या पाण्यापासून वाचवण्यासाठी माळ्यावर हिराला चढवणं अशक्यच होतं. त्यातल्या त्यात त्यानं पाण्यात डुबलेल्या जळणातलं चार-पाच लाकडी ढोपरं घेतलं नि चारी बाजूंनी हिराच्या अंगाखाली सारलं… जेणेकरून थोडं तरी पाणी तिच्या अंगावर येणार नाही. पुन्हा तो माळ्यावर जाऊन बसला. दोन्ही पाय जवळ घेऊन हातांची घडी गुडघ्यांवर ठेवली आणि हताश नजरेनं तो हिराकडं पाहू लागला.
आता हिराच्या पायाला पाणी लागलं… हळूहळू पाणी पोटापर्यंत चढलं तशी हिरा हडबडली… थोड्याफार ताकदीनिशी तिनं पाय झाडलं नि बारीकशी हंबरली. हे पाहून माळ्यावरून बाब्या खाली आला. तो कमरेपर्यंत पाण्यात डुबलेला होता. त्यानं त्याच्या उरल्यासुरल्या ताकदीनं हिराच्या अंगाखाली दोन्ही हात घालून तिला हलवण्याचा वेडा प्रयत्न केला पण तिच्या पोटातल्या जीवामुळे तिचा अधिकचा भार तिला हलूच देत न्हवता… काळ कसोटीचा होता… बाहेर पावसानं जहरी थैमान घातलेलं… आता बाब्या हतबल होऊन हिराला कवटाळूनच बसला.
त्यानं डोळं मिटलं न काहीतरी चमत्कार घडून दोघांचं जीव वाचावंत असा धावा तो मनोमन करू लागला. पाणी वाढू लागलं तशी हिरा धडपडू लागली. बाब्या तिला घट्ट पकडून बसला होता. हिरा बारीक आवाजात हंबरू लागली… तिचा स्वतःचा जीव वाचावा म्हणून ती निकराचा लढा देत होतीच, सोबतच बाब्यानं त्याचा जीव वाचवण्यासाठी तिथून निघून जावं असंही तिला वाटत असावं… शब्दांविना मुकीच ती शेवटी… न बोलता येणाऱ्या पावसासारखी.
“ये बाब्या, लवकर बस ये नावतं.” गावातल्या एका दोस्तानं आवाज दिला. दारात माणसांनी गच भरलेली नाव उभी होती. आवाज ऐकताच बाब्या तरतरला. बाब्यानं उभारून एक पाऊल नावेच्या दिशेनं टाकलं. तोवर हिराचं हंबरणं ऐकून तो जागीच थबकला! “आरं थांबू नगं ये बिगी बिगी. आता परत माघारी मरायला कोण येतंय हिथं.
पाऊस पार पिसाळलाय.” भला दोस्त बाब्याला बोलला. बाब्यानं नावेवर एक नजर टाकली व पुन्हांदा लाडक्या हिराच्या पाणीदार डोळ्यांत पाहिलं… तिच्या पोटाकडं पाहून तर त्याचं मन अधिकच कालवलं…
नंतरही पाच-सहा दिवस पाऊस वेड्यासारखा बरसून गेला. होतं-न्हवतं सगळं ओरबाडून गेला. सरकारी पंचनाम्यात नदीतून वाहत आलेली एक जोडी टीव्हीवाल्यांसाठी ब्रेकिंग न्यूज ठरली… बाब्याची हिरा! माणसांच्या कुठल्याच प्रश्नांची उत्तरं न देता मुका पाऊस मूक हिराला, तिच्या पोटातल्या मुक्या जीवाला नि बाब्याला घेऊन गेला… अन् एका शेतकऱ्याची त्याच्या गायीवरच्या अपार भूतदयेची, प्रेमाची कहाणी पुराच्या लाटांवर तरंगून गेली!
Also Read This :
अगतिक – Marathi katha
लेखा देशपांडे-शिरोळकर, पुणे
मानसी धापा टाकतच बँकेत शिरली तेव्हा घड्याळाचा मा काटा नवाला स्पर्श करत होता. कितीही आकाशपाताळ एक केलं तरी रोखपालाने बँक उघडायच्या आधी पंधरा मिनिटे हजर असावं, हा नियम तिला आजतागायत पाळता आला नव्हता.
शाखाधिकाऱ्यांच्या नाराज नजरेकडे नाइलाजाने दुर्लक्ष करत तिने कशीबशी मस्टरवर सही ठोकली आणि रोकड काढण्यासाठी अधिकाऱ्याबरोबर स्ट्राँगरूमकडे निघाली.
रक्कम घेऊन केबिनमध्ये स्थानापन्न झाल्यावर तिला हुश्श झालं. आता एक वाजेपर्यंत हेच आपलं विश्व! दुसरा कुठलाही विचार डोक्यात येऊ द्यायचाच नाही. तिने स्वतःला बजावत कामाला सुरुवात केली. पुढचे दोन दिवस शनिवार, रविवारची सुटी असल्यामुळे आज गर्दी होणार हे तिने गृहीत धरलंच होतं. पैसे मोजणे, देणे, घेणे ह्यात वेळ कसा भरभर निघून गेला कळलंच नाही.
जेवायची सुटी झाली तसा मैत्रिणींबरोबर तिने डबा खाऊन घेतला. तेवढेच चार विरंगुळ्याचे क्षण सर्वांनी हसत-खेळत घालवले. सकाळपासूनची धावपळ, मुलीचा पाळणाघरात जातानाचा रडवेला चेहरा, सगळ्याचा तिला तात्पुरता विसर पडला होता. आता निवांत झाल्यावर लेकीचा चेहरा तिच्या डोळ्यांसमोर आला.
सहा महिन्यांपूर्वी अचानक तिच्या आईचं निधन झालं, आणि आजीच्या घरी लाडात वाढणाऱ्या तिच्या लेकीला एकदम पाळणाघरात ठेवायची वेळ आली. त्या छोट्या जिवाला हा बदल पचनी पडायला त्रासच होत होता आणि साहजिकच तिच्यातल्या आईलाही ते जड जात होतं.
रोखीचा हिशेब तपासून रक्कम तिजोरीत ठेवायला जाताना अधिकाऱ्याने सूचना दिली, ‘आज विभागीय कचेरीकडून जास्तीची रोकड मागवली आहे. ती मंडळी पोचेपर्यंत स्ट्राँगरूमच्या फक्त जाळीच्या दाराला कुलूप लावून ठेवू, आणि जास्तीची रक्कम आल्यानंतर मुख्य दरवाजा बंद करू. तोपर्यंत मी एक महत्त्वाचं काम करून अर्ध्या तासात येतो. तिने होकारार्थी मान डोलावली व पुढच्या कामाला लागली.’
अधिकाऱ्याला जाऊन जेमतेम पाच मिनिटे होतात न होतात तोच एक गोष्ट घडली. एक मांजरी येऊन जाळीच्या दाराशी अस्वस्थपणे घुटमळू लागली. तिने म्याव म्याव करत पंजाने दारावर मारायला सुरुवात केली आणि आतल्या बाजूने एक छोटंसं मनीच पिलू जाळीपाशी येऊन तिला प्रतिसाद देऊ लागल.
कामाच्या धामधुमीत कधी ते पिलू आत जाऊन बसलं हे कोणालाच कळलं नव्हतं.
तिजोरीच्या खोलीतच लॉकर्सपण असल्यामुळे तिथे एक मोठं लाकडी पार्टिशन होतं. बहुधा ते पिलू उबेला तिकडे जाऊन बसलं असावं, आणि नकळत झोपी गेलं असावं. तिला
खूप अस्वस्थ वाटायला लागलं. त्या पिलाच्या जागी तिला आपल्या लेकीचा चेहरा दिसायला लागला. पाळणाघराच्या खिडकीच्या गजांना धरून वाट पाहणारा !
पण अधिकारी परत येईपर्यंत काहीच करता येत नव्हतं. तिच्या एकटीच्या किल्लीने दार उघडणं शक्य नव्हतं. तिने मोबाइलवर अधिकाऱ्याशी संपर्क साधायचा प्रयत्न केला पण तो निष्फळ ठरला. आता त्याची वाट पाहत बसण्याशिवाय काहीच पर्याय नव्हता. बँकेतली सर्व मंडळी गोळा झाली. त्या मायलेकरांच्या तात्पुरत्या का होईना पण ताटातुटीमुळे, आणि त्यांच्या डोळ्यातल्या करुण भावामुळे कोणाचंच कामात लक्ष लागेना.
तरी त्यातल्या त्यात समाधानाची गोष्ट अशी की मनीला वेळीच पिलाची आठवण झाली होती. जरा उशीर झाला असता तर दोन दिवस बँक बंद असणार होती. त्या विचारानेच तिच्या मनाचा थरकाप उडाला. अशा घालमेलीत बराच वेळ गेला. दारावर पंजे मारून मारून मनी हताश बसून राहिली. पिलू पण मलूल पडून होतं. आणि इतक्यात अधिकारी परत आला.
“अहो साहेब, लवकर चला. ते… ते… पिलू आत अडकलंय हो केव्हाचं!” तिचा स्वर रडवेला झाला होता. शेवटी एकदाचं कुलूप उघडलं आणि मनीने पिलावर झडप
घातली. त्याला चाटत, कुरवाळत आनंदाने म्याव म्यावचा जप करत ती त्याच्याभोवती नाचू लागली. भेदरलेले भाव डोळ्यांत घेऊन पिलू टकामका इकडे तिकडे बघत होतं. साऱ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
रोकड घेऊन येणारी मंडळी रहदारीत अडकल्याने पोचायला उशीर होईल असा त्यांचा निरोप आला आणि तिला एकदम उदास वाटलं. आज परत उशीर होणार. माझं पिलू पाळणाघरात वाट बघून कंटाळून जाणार. मनीच्या पिलाची सुटका झाली, पण माझ्या बाळाची ह्यातून इतक्यात तरी सुटका नाही ह्या विचाराने तिच्या डोळ्यांत पाणी आलं.
“अहो मॅडम, इतकं काय मनाला लावून घेताय?”
पोचलं की ते पिलू आईकडे. भारीच बुवा हळव्या तुम्ही. सहकाऱ्याच्या शेरेबाजीकडे कानाडोळा करत तिने हळूच डोळ्यातलं पाणी टिपलं आणि अधीरपणे ती रोकड घेऊन येणाऱ्या मंडळींची वाट पाहू लागली.
नाइलाजाने का होईना तिच्यातल्या आईवर तिच्यातल्या कर्तव्यदक्ष कर्मचाऱ्याने मात केली खरी, पण तिच्या डोळ्यांतल्या अश्रूंच्या झिरझिरीत पडद्यामागे त्या अडकलेल्या पिलाचं चित्र धूसर होत चाललं होतं.
हे पण वाचा :
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता
पश्चात्ताप… – marathi story
सौ. सुनेत्रा विजय जोशी, रत्नागिरी
अनूचे नि राजेशचे नुकतेच लग्न झाले होते. घरात ते दोघे आणि राजेशचे वडील असे तिघेच राहणारे, वडील श्रीकांतराव आणि आईने पै पै साठवून तेव्हा ही जागा घेतली म्हणून. नाहीतर आज मुंबईत एक रूम स्वतःची घेणे मुश्कील. राजेशची आई तो कॉलेजला शिकत असताना गेलेली. घरातल्या कामाला सखूबाई होती. दिवसभर सगळे आटोपून संध्याकाळी ती निघून जायची. स्वयंपाक, वरची आवराआवर सगळे तीच बघायची. पण अनूला आता तिचे दिवसभर असणे म्हणजे प्रायव्हसी राहत नाही असे वाटू लागले.
मग सकाळी आवरून सखूबाई घरी परत जायची आणि संध्याकाळी परत येऊन स्वयंपाक करून जायची. नव्या नवलाईचे दिवस होते. आता सखूबाई दुपारची नसल्याने साहजिकच मागचे ओटा टेबल आवरणे, कपड्यांना घड्या घालणे वगैरे कामे अनूवर आली. पण मग श्रीकांतराव पण तेवढाच वेळ जावा म्हणून ही कामे करायला आपणहून मदत करीत. तरीही अनूला ही लुडबूड वाटे. हवे तेव्हा बाहेर येणे-जाणे यावर नजर राहते असे तिचे मत. ती राजेशला म्हणाली, “आपण बाबांना एखाद्या चांगल्या वृद्धाश्रमात ठेवू या. एकदा पैसे भरले की झाले. त्यांना पण बरोबरीचे लोक भेटतील. आपल्याला पण आडकाठी नको.” राजेशने ते काही मनावर घेतले नाही.
एकदा श्रीकांतराव मित्रांसोबत टूरवर गेले आठ दिवस. मग काय अनू खूश झाली. पण तेव्हाच नेमकी सखूबाई पण रजेवर होती. मग काय राजेश कँटीनमध्ये तर अनूची घरी मॅगी-ब्रेड-ऑम्लेट. पण स्वयंपाक नसला तरी बाकी कामे होतीच. आता अनूला समजले बाबा घरात किती न दिसणारी कामे सहज करत होते. त्याच वेळेस एक दिवस राजेश म्हणाला, “अनू आज बाहेर जाऊया.” दोघे गेली. गल्लीत एका अंधारी चाळ होती. तिला कळेना इथे कशासाठी? पण मग तेवढ्यात एक माणूस येऊन किल्ली देऊन गेला.
राजेशने दार उघडले. दोन अंधाऱ्या खोल्या होत्या. “बघ अनू कशी बाटली जागा. तुला बाबांसोबत राहायला नकोय ना! मग आपण इथे वेगळे राहू.” “अहो पण आपली एवढी मोठी जागा असताना इथे का राहायचे?,” अनू म्हणाली. त्यावर राजेश म्हणाला, “सांभाळून शब्द वापर. ते घर आपले नाही. बाबांचे आहे. त्यांच्या कष्टाचे आहे. ते का घरातून जातील? आपल्याला त्रास होतो तर आपण बाहेर पडायला हवे. आणि त्यांचे बघायला सखूबाई आहेच. तू येण्याआधी पण ती सगळे करायचीच ना. आता या क्षणी मला जे भाडे परवडते त्यात अशीच जागा मिळू शकते.
उद्यापर्यंत विचार कर तू.” आणि ते निघाले ते थेट घरी आले. “अहो पण या घरावर आपला पण हक्क आहे ना?” अनू म्हणाली. “हो आहे ना पण त्यांच्या पश्चात. आता नाही. आणि हक्क कळतो तसे कर्तव्य पण कळायला हवे ना? ते कसे विसरलीस ?” या राजेशच्या म्हणण्यावर मात्र तिच्याकडे उत्तर नव्हते. तिला स्वतःचीच लाज वाटली. आपण किती खालच्या पातळीवर उतरलो म्हणून. खरेच क्षणिक सुखाच्या कल्पनेने आपण काय हट्ट करत होतो. चुकलेच आपले. ती राजेशला म्हणाली, “मी चुकले मला माफ करा.” राजेश म्हणाला, “तुला तुझी चूक कळली ना? मग माझ्या मनात काही राग नाही.
हे सगळे बोलणे श्रीकांतराव बाहेर दाराजवळ उभे राहून ऐकत होते. ते मनातल्या मनात म्हणाले, ‘बायको जिंकलीस बाई तू, अशा मुलाला जन्म देऊन’ आणि त्यांनी बेल वाजवली. अनूने दार उघडले. ‘बाबा आलात” अन् नाकाला गरमागरम समोशाचा वास आलाच. त्यांच्या हातात पुडी होती. अग तुला ते कोपऱ्यावरचे समोसे आवडतात ना म्हणून आणले. आता फक्त चहा कर. राजेशने अनूकडे पाहिले. तिच्या डोळ्यांत पश्चात्तापाचे अश्रू होते आणि ओठावर मात्र आनंदाचे हसू.
हे पण वाचा :
माझा आवडता सण दिवाळी मराठी निबंध
करडू – Marathi katha
- मिथुन बोबडे
गावावर सूर्यकिरणे पडायला अवकाश होता. पहाटेच्या गाप्रकाशाची चाहूल डावलत अहोती. हातले सर्वजण गाढ झोपेत होते. थंडीचा कडाका अजूनही कायम होता.. काहींच्या घरात घोरण्याचा आवाज अजूनही येत होता. तितक्यात सगळ्यांच्या मधोमध झोपलेल्या लहानशा चिकूला जाग आली. तो अचानक उठला. त्याने आजूबाजूला नजर फिरकवली. डोळे चोळत दबक्या पावलाने तो बाहेर आला.
त्याच्या कोवळ्या चेहऱ्यावर विलक्षण शांतता होती. हळूच दबक्या पावलाने शेडमध्ये गेला. शेडच्या आत तसा अंधारच होता. चिकूची खटपट चालू होती. थोड्या वेळाने बाहेर येताच त्याच्या हातात एक दोरी होती आणि दुसऱ्या टोकाला होत एक गोंडस करडू. त्याने दोरी काढून शेडमध्ये फेकली आणि दुसरी घराजवळील दोरी घेऊन तो हळूच करडूला घेत ताडताड निघाला. करडूही त्याच्या पाठी उड्या मारत येऊ लागला. गावात अंधूक प्रकाशात दोघे झपाझप पावले टाकत होते. त्या थंडीनेही चिकूची पावले मंदावली नाहीत.
थोड्यात वेळात गाव दूर जाऊ लागलं. वस्त्या कमी झाल्या. कोंबड्याने पहाटेचा आरव दिला होता. आकाश आता तांबूस किरणांनी भरलं होतं. गावातलं मंदिर फुलांनी आणि दिव्यांच्या रोषणाईने सजलं होतं. गावच्या रस्त्यांच्या बाजूला खेळण्यांची छोटी दुकानं लागायला सुरुवात झाली होती. चिकू मात्र वेगाने पावलं टाकत होता. करडूसुद्धा इकडे तिकडे मान फिरवत चिकूच्या पाठी उड्या मारत होतं.
चिकू आणि करडू आता रानात पोहचले होते. कच्ची वाट सुरू झाली होती. रानामधून वाट काढत ते एका लहान झाडाजवळ आले. ते झाड झुडपांनी वेढलेलं होतं. चिकू करडूला घेऊन झाडाजवळ स्तब्ध उभा राहिला. त्याने हळूच चहूबाजूंनी कटाक्ष फिरवला आणि घरातली दोरी बाहेर काढली आणि करडूला त्या झाडाला बांधलं. चिकू बाजूच्या दगडावर जाऊन बसल करडूवरून हात फिरवला.
त्याच्या ऊच त्याचं लक्ष होतं. हळूच तो बाजूच्या शेतात गुलाकडचा चारा उचलून त्याने करडूच्या बाजूला ठेवला आणि पुन्हा करडूला कुरवाळत दगडावर बसला. रानामध्ये किड्यांचा आवाज घुमत होता. गावातल्या चुलींचा धूर लांबवर पसरला होता. चिकू काही वेळ असाच हातातली काडी फिरवत बसून राहिला आणि नंतर अचानक तो उठून उभा राहिला. करडूवर एक कटाक्ष टाकत त्याने उलट्या दिशेने चालायला सुरुवात केली… करडू आणि चिकूतील अंतर वाढत होतं.
रानातून वाट काढत तो गावात पोहचला. पहाट झाली होती.
गावातली लगबग चालू झाली होती. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना खेळण्याची आणि मिठाईची दुकानं सुरू झाली होती. वासुदेव गावात फिरत होता. देवळामध्ये घंटानाद सुरू होता. चिकू घरी पोहचला आणि दबक्या पावलाने घराबाहेर बसलेल्या आजीजवळ गेला. आजीने लगेच त्याला कवेत घेतलं आणि गोंजारलं.
शेडबाहेर त्याचे वडील आणि दोन माणसं त्यांच्या सायकलबरोबर उभी होती. एका माणसाच्या हातात धारदार सुरी होती. त्या दोघांमध्ये हसत बोलणं चालू होतं. चिकू त्यांच्याकडे टक लावून बघत होता. नंतर वडिलांनी शेडजवळ बोट केलं. ते दोघं शेडमध्ये गेले आणि लगेच हातात तुटलेली दोरी घेऊन बाहेर आले. त्यांचे डोळे विस्फारले होते. एक अनाकलनीय भाव त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. त्यांना बघून वडील धावत शेडमध्ये गेले. त्यांच्या सायकलच्या डब्यावर लिहिलेलं होते, ‘बाबू मटन शॉप!’
चिकूच्या चेहऱ्यावर आता एक गोड हसू होतं.
रवळी – Marathi katha
चेतन किशोर ठाकूर, पालघर
चुलीची लाकडे भरभरून धूर काढत होती, खोकत खोकत जुन्या मळलेल्या वर्तमानपत्राचे दोन फाटलेले कागद त्या चुलीमध्ये कोंबली आणि एक मोठा श्वास घेऊन जोरदार फुंकर मारली तेव्हा कुठे त्या लाकडांना ज्वाळा लागल्या.
बँकेमधून वृद्धत्वाला आधार म्हणून मिळणारी तुटपुंजी पेन्शन नामक रक्कम गेले तीन महिने मिळाली नव्हती. त्यामुळे तिने रोजच्या ओळखीच्या शेजारील लोकांकडून थोडे पैसे उधारीने नेहमीप्रमाणे घेतले होते. ते पेन्शन मिळाल्यानंतर अगदी प्रामाणिकपणे परत करणार होती.
आजचा दिवस थोडा वेगळा होता. उद्या तीन महिन्यांनी मुलगा घरी येणार होता. त्याला काम, पार्टी, सेलिब्रेशन, मित्रमंडळी, सोहळे, बायको-मुले, सासुरवाडी यांच्यामधून वेळ मिळतंच नाही. त्यामुळे त्याला तो वेळ कसाबसा काढावा लागतो हेसुद्धा तिला ठाऊक होते.
चुलीने वणव्याचे रूप घेतले असं तिला समजलं आणि ती वाकलेली कंबर थोडी सरळ करून उभी राहिली. तिच्या उंचीएवढ्या भिंतीला लावलेल्या लाकडी फळीवरून ॲल्युमिनिअमचा टोप (पातेले) खाली उतरवून तिने ते चुलीवर ठेवले.
बारा ते पंधरा वर्षांपूर्वी जी एकटी पंचवीस लोकांचे जेवण करीत होती तिला आज एक भांडे उचलताना भरपूर त्रास होत होता.
चुलीच्या बाजूलाच ठेवलेल्या स्टीलच्या कळशीमधील पाणी तिने त्या पातेल्यामध्ये भरले आणि चुलीमध्ये अजून तीन लाकडे कोंबली. थोड्या वेळाने पाणी खळखळन उकळू लागले.
आज संध्याकाळी शेजारच्या मुलाला दोन रुपये खाऊ खाण्यासाठी देऊन तिने दुकानामधून त्याच्याकडून तूप, गूळ आणि वेलची या वस्तू आणल्या होत्या. तसेच गेला आठवडा आजूबाजूच्या तिच्या समवयस्क बायकांसोबत गप्पा-गोष्टी करत तिने जात्यावरून तांदूळ दळून रवा तयार केला होता, पीठ वगैरे सर्व ठीक आहे परंतु रव्यासाठी तिचा पिठाच्या गिरणीवर (चक्कीवर) काडीमात्र विश्वास नव्हता. त्यामुळे जात्यावर रोज संध्याकाळी अर्धा ते पाऊण तास बसून तिने हे नित्यकाम केले होते.
कागदात बांधून आणलेला गूळ आणि तूप तिने त्या उकळत्या पाण्यामध्ये सोडले. वेलची कुटण्यासाठी जागा नव्हती म्हणून तिने बाजूचा बसण्याचा लाकडी पाट काढला तो पदराने हळुवार पुसला आणि वेलची सोलून त्यामधील दाणे त्यावर ठेवून लोखंडी फुकणी वर फिरवली. त्यामुळे झालेली वेलचीची पूड त्या गरम पाण्यामध्ये सोडली आणि एका पळीने ते पाणी ढवळत राहिली.
थोड्या वेळाने पळीने हातावर दोन थेंब घेऊन चाखून पाहिले आणि तिला जाणवले की, आपला वर्षानुवर्षांचा अंदाज अजूनपर्यंत चुकलेला नाही. त्यानंतरच तिने त्यामध्ये चवीपुरते मीठ घातले आणि जात्यावर दळलेला रवा त्यामध्ये टाकला.
एका हातात कापडी पोतेरे आणि दुसऱ्या हातामध्ये कलथा असे धरून त्या पातेल्याला पकडून सर्व मिश्रण एकजीव करीत राहिली. अंदाजे पंधरा मिनिटांनी तिने पुन्हा ते मिश्रण चाखून पाहिले आणि सर्व योग्य आहे असे समजून तोंडात हम्मम्म असे पुटपुटत डोके हलवले.
तिच्या मुलांप्रमाणे आसपासच्या केळीची झाडेही आता राहिली नव्हती. त्यामुळे तिने भेंडीच्या झाडाची काही हिरवीगार पाने आणली होती. ती तिने संध्याकाळीच स्वच्छ पाण्याने धुऊन ठेवली होती. चुलीवर ठेवलेले ते मिश्रण एकजीव होऊन थोडे शिजले होते त्यामुळे तिने पुन्हा कलथा घेऊन ते मिश्रण पातेल्यात पुन्हा फिरवून दाबले आणि वरचा थर सपाट केला.
भेंडीच्या ओल्या पानांचा जाड गालिचा तिने त्या मिश्रणावर आंथरला. त्यानंतर चुलीमधील काही निखारे त्या पानांवर ठेवले. चुलीमधील लाकडे बाहेर काढली. थोडे विस्तव चुलीत ठेवून आग थंड केली. ज्वाला मंद झाली, आणि ती एक मोठा श्वास घेऊन शांत झाली. त्यानंतर सर्व आवरून त्या शांततेत झोपी गेली.
सकाळी लवकर म्हणजे चार वाजताच्या सुमारास उठून ती थेट चुलीपाशी पोहचली. तेव्हा तिने पाहिले की, आग विझली होती. तोंड वगैरे धुतले. अंघोळ केली. दारासमोरच्या तुळशीला सकाळीच एक तांब्या पाणी घालून नमस्कार केला. त्यानंतर तिने ते पातेले चुलीवरून खाली उतरवून परातीमध्ये पालथे घातले. केकसारखी दिसणारी ती ‘रवळी’ सर्व बाजूनी शिजली होती. तिने ती पुन्हा भेंडीच्या पानांच्या आवरणात ठेवली आणि वरून नवेकोरे शेजारच्या घरातून मागितलेले वर्तमानपत्र आवरण म्हणून गुंडाळले आणि तिच्या कन्यादानात मिळालेल्या पितळेच्या टाकीमध्ये तिने ती रवळी ठेवली आणि त्या टाकीच्या कडीला एक दोरी बांधली व त्या दोरीला तीन ते चार गाठी मारून पुन्हा एकदा येऊन चुलीपाशी बसली.
सूर्य उगवण्याच्या आधी पुन्हा सर्व तिने आवरून घेतले, झाडून घेतले आणि स्वतः फार आनंदी आहे असा चेहऱ्यावर भाव आणला होता.
सकाळी मुलगा नेहमीच्या गाडीने आला. चहा-नाश्ता, रवळीचा एक लहानसा तुकडा, अर्धा त्याने खाल्ला. आजूबाजूला फेरफटका मारून थोडा चहा घेतला त्यानंतर हातामध्ये शंभर-पाचशे रुपये दिले गेले. नेहमीप्रमाणे लवकर जायचे आहे हे कारण दाखवून मुलगा परतीच्या प्रवासाला निघाला. त्यामुळे तिने कापडी पिशवीमध्ये ती रवळी त्याच्या हाती दिली. ती घेऊन हात दाखवून तो निघून गेला हवेसारखा.
पूर्वी दिवाळीच्या आधी भात दळले जात असे. त्यामुळे निघणारा तूस जाळून त्याच्या रांगोळ्या शेतकरी अंगणात काढत असत आणि तो आठवंडे नामक सण दिवाळीच्या आठ दिवस आधी येत असे. त्यानंतर दिवाळीच्या पहिल्या दिवशी दळून आणलेल्या तांदळाचा जात्यावर दळलेला रवा काढून रवळी बनवत असत आणि ती रवळी म्हणजेच घरातील गोड पदार्थ. त्या वेळी या सर्व भावंडांची त्यावर उडी पडत असे. हे सारं तिला सरसर डोळ्यांसमोर आठवले. तिने तोंडावरून सुका पदर फिरवला आणि झालेला ओला पदर कंबरेला बांधून ती रोजच्या कामाला लागली.
मुलगा शहरात त्याच्या घरी पोहचला त्या दिवशी आज ‘मदर्स डे’ आहे, हे त्याच्या मुलांकडून त्याला कळले. त्यामुळे सर्वांच्या हट्टामुळे त्यांनी ऑर्डर करून केक, पिझ्झा आणि बर्गर मागवला आणि पोट तुडुंब होईतोवर खाल्ला. रवळी भेंडीच्या पानांमध्ये फ्रीजमध्ये तीन दिवस तडपत राहिली होती त्यानंतर चौथ्या दिवशी उकिरड्यावर जाऊन पडली. कोणीही न चाखता न खाता.
इथे चुलीपाशी बसलेली ‘ती’ घरातील मुलाने घेऊन दिलेला लँडलाइन फोन पाहत होती की, तो वाजेल आणि कोणीतरी म्हणेल,
“आई रवळी छान होती!”
संदर्भ :
हे पण वाचा :
तर मित्रांनो तुम्हाला या Marathi Katha कश्या वाटल्या ते कमेंट करून नक्की कळवा. जर तुम्हाला हि अशा कथा लिहण्याची आवड असेल तर तुम्ही तुमच्या कथा आम्हाला Shabdakshar20@gmail.com या इ मेल वर पाठवू शकता.
One Comment