|

{ESSAY} स्वामी विवेकानंद मराठी निबंध | Swami Vivekananda essay in Marathi

स्वामी विवेकानंद मराठी निबंध

स्वामी विवेकानंद मराठी निबंध

गगनाला भिडलेले ‘महाभारत’ म्हणजेच स्वामी विवेकानंद

बारा जानेवारी. स्वामी विवेकानंदांचा जन्मदिवस. स्वामींचे अवघे जीवन हा पराक्रमाचा, पौरुषाचा, ‘धर्म, होता. राष्ट्र आणि संस्कृती’ यांच्या जयघोषाचा एक महोत्सव
कसे घडले, वाढले विवेकानंद ?
केले तरी काय त्यांनी आपल्या योग्यतेच्या सिद्धतेसाठी, संवर्धनासाठी?

तसे पाहू जाता ते कलकत्ता विद्यापीठाचे केवळ पदवीधर होते. येथेच त्यांचे शिक्षण थांबले होते. पण ते कधीच संपले नव्हते. स्वामीजींनी आजन्म अध्ययन केले. विविध ज्ञानशाखांतील प्रातिनिधिक ग्रंथ त्यांनी वाचून काढले. त्या काळी प्रसिद्धीला आलेले ज्ञानकोशांचे सर्व खंड चाळले. त्यातील बराच भाग सहज स्मृतिगत झाला होता. विलक्षण एकाग्रता, प्रखर बुद्धिमत्ता, विवेक आणि वैराग्यसंपन्न जीवन यांच्या बळावर ते ज्ञानयोगी झाले. विद्या त्यांच्या जिव्हाग्रावर विसावली.

स्वामीजींनी विद्यार्थिदशेत भारतीय शास्त्रीय संगीताचा सलग साडेतीन वर्षे अभ्यास केला होता. संगीताने कान, मन, बुद्धी आणि आत्मा यांचे उन्नयन घडते, अशी त्यांची धारणा होती.

विवेकानंद हे व्यायामशाळेत जाणारे, क्रीडांगणावर तळपणारे उत्तम खेळाडू होते. 

‘सामर्थ्य हेच जीवन. दुर्बलता म्हणजे मूर्तिमंत मरण’

असे ते म्हणत. त्यांना भेकडपणाचे वावडे होते. सुदृढ बांधा हाच व्यक्तिमत्त्वाचा पाया असे ते मानत. स्वामीजींना पोरवयातच परमेश्वरप्राप्तीचे वेध लागले होते. या परमार्थवेडाने त्यांना रामकृष्ण परमहंसांच्या पायी नेऊन उभे केले. स्वामी विरक्त झाले. गुरूच्या छत्रछायेत त्यांनी जीवनातील साडेपाच वर्षे घोर साधन केले. भक्ती, योग, ज्ञान, कर्म, ध्यान, समाधी या संकल्पनांचे ते जाणकार आणि भाष्यकार झाले. परमार्थ त्यांच्या नसात आणि श्वासात भिनला. आत्मलीनतेच्या कोशात ते कोंडून पडतील हे ओळखून त्यांच्या गुरूंनी त्यांच्या हाती जनकल्याणाचे कंकण बांधले.

रघुरायाचा वर ।
पवलो सत्वर ।
जनाचा उद्धार करावया ॥

हा त्यांच्याही अंतर्यामी प्रकट झाला. रामदासांप्रमाणे त्यांनी परिव्राजकाची वस्त्रे परिधान करून तीन वर्षे भारतभर परिभ्रमण केले. कलकत्त्यापासून काठेवाडपर्यंत, काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत अवघा देश नजरेखाली घातला. फिरता फिरता ते भारतमय झाले.

स्वामीजी म्हणत, 

“ज्याला जगासाठी काही करावे वाटते, त्याने जग पाहिले पाहिजे, जाणले पाहिजे. विज्ञान आणि वेदांत याचे यथार्थ आकलन आणि मीलन हाच मुक्तीचा मार्ग मानला पाहिजे.“

इसवी सन १८९३ मध्ये वयाच्या तिसाव्या वर्षी विवेकानंद शिकागोच्या व्यासपीठावर प्रकट झाले. ११ सप्टेंबर या दिवशी जगाच्या इतिहासात आणि नकाशात भारताला एक अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले. १५ जानेवारी, १८९७ या दिवशी स्वामीजी भारतात परत आले. साडेतीन वर्षे अमेरिका, इंग्लंड, स्वित्झर्लंड, जर्मनी, इटली, फ्रान्स अशा देशोदेशीच्या संस्कारपीठांना कृतार्थ आणि पावन करून स्वामीजी परत मायदेशी आले.

वयाच्या चाळिसाव्या वर्षी ४ जुलै, १९०२ या दिवशी त्यांनी कैवल्याचे गगन गाठले. आपल्या एका जन्मात अनेकांचे अनेक जन्म ते जगले. प्रयत्नाने माणूस गगनाला भिडतो आणि आपल्या बांधवांचे जीवन उजळून टाकतो. स्वामीजींचे जीवन हे नवभारतातील एक ‘महाभारत’ ठरले.

हे नक्की वाचा :

तुम्हाला हा स्वामी विवेकानंद मराठी निबंध कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद..!

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *