{Essay} माझा मित्र मराठी निबंध । Essay on my friend in marathi
माझा मित्र मराठी निबंध – नमस्कार विद्यार्थी मित्रांनो , आपल्या शालेय जिवनातील अविभाज्य घटक म्हणजे निबंधलेखन अनेकदा शिक्षक आपल्याला नवनविन विषयांवर निबंध लिहायला सांगतात. अशा नवनविन विषयांवर कल्पनांचे अन्वेषण व्हावे व विद्यार्थ्यांची मदत व्हावी या हेतूने आम्ही नेहमी नवीन निबंध घेऊन येत असतो.
माझा मित्र मराठी निबंध
“मित्र ईश्वराचा दूत, मित्र आयुष्याचा ठेवा खिन्न एकांताच्या क्षणी, मित्र मनाचा विसावा”
खरा मित्र जो संकटात उपयोगी पडतो. आपल्या जीवनात मित्राला अनन्यसाधारण महत्व असते. आईवडील, भाऊबहिण ही नाती रक्ताची असतात. मित्रत्वाचे नाते आपल्या वागण्याने व आपापसातील जिव्हाळ्यानेच जोडले जाते. नातेवाईकांपेक्षा मित्राचे नाते जास्त जवळचे वाटते.
मित्राचे नाते हे दुःखाच्या प्रसंगी मनाला धीर देणारे व सुखाच्या प्रसंगी आनंद द्विगुणीत करणारे असल्यामुळे त्याचा ओढा वाटतो. अलंकाराप्रमाणे शोभा देणारे मित्र किंवा तोंडावर स्तुती करणारे मित्र खरे मित्र होऊच शकत नाहीत. खरा मित्र आरशाप्रमाणे आपले खरे प्रतिबिंब दाखवून आपल्या गुणदोषांचे दर्शन घडवतो. म्हणूनच खऱ्या मित्राला, जीवनप्रवाहाला वळण लावणाऱ्या तटाची उपमा देण्यात आली आहे. खरा मित्र हा सूर्यासारखा असतो.
मला खूप मित्र आहेत पण निखिल हा माझा जिगरी दोस्त आहे. जरी आम्ही शालेय जीवन जगत असलो तरी त्याचे विचार माझ्या मनाला खूप भावतात. गणितात माझी फार प्रगती नाही हे हेरुन त्याने माझी कान उघडणी केली. माझ्याबरोबर तासनतास गणिताचा सराव केला म्हणून मला वार्षिक परीक्षेत चांगले मार्क मिळाले. निखिल सर्व क्षेत्रामध्ये परिपूर्ण असा विद्यार्थी आहे. अभ्यासात तो हुशार आणि तरतरीत तर आहेच पण खेळातही निपुण आहे. आमच्या शाळेच्या फुटबॉल संघाला राज्य पातळीवर सुवर्ण पदक मिळवून देण्यात निखिलचा सिंहाचा वाटा होता. त्याचा सकस आणि चौरस आहार त्याच्या निरोगी तब्येतीची निशाणी आहे. गेल्याच वर्षी गणेशोत्सवात विद्युत रोषणाईने अपघात घडून बेशुद्ध पडलेल्या एका मुलाला वाचवल्याबद्दल त्याला राष्ट्रपतींकडून शौर्य पुरस्कार प्रदान झाला होता. त्यावेळी शाळा व गावकऱ्यांनी देखील त्याचा सत्कार करुन त्याची प्रशंसा केली होती. सर्वांना मदत करण्यासाठी तो नेहमीच तत्पर असतो.
गरीब आणि दीनदुबळ्यांची सेवा करण्यासाठी आठवड्यातून एक दिवस तरी तो आश्रमात फेरी मारतोच. असा हा सर्वगुणसंपन्न मित्र मला लाभल्याबद्दल मी नेहमीच देवाचे आभार मानतो व माझ्या मित्राला त्याच्या भविष्यकालीन जीवनाबद्दल सुयश चिंतितो.
“मित्र सुखाचा श्रावण, मित्र देहातला प्राण सुन्न एकटेपणात मित्र राखतो इमान”
तुम्हाला हा माझा मित्र मराठी निबंध कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद..!
आमच्या इतर पोस्ट्स –
५८+ Easy Marathi Nibandh | सोपे मराठी निबंध
लालबहादूर शास्त्री मराठी निबंध
झाशीची राणी – लक्ष्मीबाई मराठी निबंध
स्वातंत्र्यवीर सावरकर मराठी निबंध
One Comment